मिरारोड – सोन्याचे चेन लुबाडण्याकरीता ईसमाचा खून करून पुरावा नष्ट केलेला गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक . अधिक माहितीनुसार श्री. समीर विठ्ठल तांबे, रा. गौरव गॅलेक्सी फेज-०१, मिरारोड पूर्व यांनी त्यांचे वडील श्री. विठ्ठल बाबुराव तांबे, वय-७५ वर्षे हे दिनांक १६.०९.२०२५ रोजी मिसिंग झाल्या बाबत काशिमीरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून मिसिंग केस दाखल करून चौकशी पोहवा / दिनेश भोर यांचेकडे तपास देण्यात आला होता.नमुद मिसिंग व्यक्तीची आजू-बाजुचे पोलीस ठाण्यांना माहीती कळवून, सर्वोतोपरी हरवलेल्या व्यक्तीचे फोटो व वर्णनासह माहीती शेअर करुन बिट अधिकारी/अंमलदार, बिट मार्शल, पेट्रोलिंग स्टाफ, गुन्हे प्रकटीकरण स्टाफ यांना हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
नमुद व्यक्तीचा शोध घेत असताना खबर देणार यांच्या घरापासून आजुबाजुच्या परिसरामधील अनेक सी.सी.टी.व्ही. कॅमेराचे फुटेज तपासले असता दि. १६/०९/२०२५ रोजी १४:०६ वा. च्या सुमारास सरस्वती बिल्डींग, एम.आय.डी.सी. रोड मिरारोड इमारतीमधील सागर सलून शॉप नं.८ या दुकानमध्ये हरवलेली व्यक्ती विठ्ठल बाबुराच तांबे हे प्रवेश करतांना दिसून आले. त्यानंतर दि.१७.०९.२०२५ रोजी रात्रौ ०२.५९ वा. एक इसम दुस-या एका इसमास सागर सलून, शॉप नं.८, सरस्वती बिल्डींग, एमआयडीसी रोड, मिरारोड शॉपमधून बाहेर दोन्ही हाताने ओढत, फरफटत फुटपाथवरुन नेतानां दिसून आले. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे दि. १८.०९.२०२५ रोजी दुपारी ४.०० वा. चे सुमारास सलून चालकावर संशय बळावल्याने त्याच्या कडे पोलिसांनी विचारपुस केली असता उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने त्यास ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले, ” एक वृध्द व्यक्ती सलूनमध्ये टॉयलेट कुठे आहे? असे विचारत शॉपमध्ये आला व बराच वेळ तेथे बसुन होता, त्याचे गळ्यात असलेली सोन्याची चैन पाहून त्यास दुकानात बसण्यास सांगितले, थोड्या वेळानंतर दुकानामध्ये कोणीही ग्राहक नसल्याने, त्या इसमाचा टॉवेलने तोंड व नाक दाबून हाताने गळा आवळून जिवे ठार मारले व त्याचे गळ्यातील सोन्याची चेन काढून घेवून त्यास जिवे ठार मारून त्याचे प्रेत दुकानात्तच ठेवले. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणीही येत-जात नसल्याची खात्री करुन प्रेत सलून जवळील गाळा नंबर-०१/०२, बारक्या लॉकचाला या दुकानसमोरील गटाराचे झाकण उघडून त्यामध्ये प्रेत टाकून पुरावा नाहीसा केला” असे त्याने सांगितले. मृतदेह गटारातून ताब्यात घेतण्यात आला आहे.
सदर ईसम हरवलेल्या चौकशीमध्ये सलून चालक अशफाक इशाक शेख याने हरवलेली व्यक्ती श्री विठ्ठल बाबुराव तांबे यांची सोन्याची चेन काढून घेवून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोहवा/दिनेश भोर यांचे खबरीवरून दि. १९.०९.२०२५ रोजी काशिमीरा पोलीस ठाणे गुन्हा नोंद करून आरोपी अशफाक इशाक शेख, वय-३९ वर्षे, व्यवसाय सलून चालक, रा. सागर सलून, शॉप नं.८, सरस्वती बिल्डींग, एमआयडीसी रोड, मिरारोड मुळ रा.- उत्तरप्रदेश यास पुराव्याअंती अटक केली आहे. गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती शितल मुंढे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) हया करीत आहेत.
नमुद खूनाचा गुन्हा उघड करण्याचे अनुषंगाने मा. श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार, मा. श्री. राहुल चव्हाण, पोलीस उपायुक्त, परि-०१, मिरारोड, मा. श्री. गणपत पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड, आणि मा. राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिमीरा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
