₹२०.४० लाख किंमतीचे मोबाईल परत मिळवून नागरिकांचे पोलिसांवरील विश्वासात वाढ
पालघर (११ सप्टेंबर २०२५):पालघर जिल्हा पोलीस दलाने भारत सरकारच्या दुरसंचार विभागाच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या सहाय्याने एकूण १०४ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल फोन, ज्यांची एकूण अंदाजित किंमत ₹२०,४०,०००/- आहे, ते शोधून काढण्यात यश मिळवले आहे.
या यशस्वी मोहिमेच्या अनुषंगाने दि. ११ सप्टेंबर रोजी, पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. संजय दराडे यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल फोन परत देण्यात आले.
सदर कार्यक्रमात मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, नवी मुंबई, श्री. संजय दराडे यांनी पालघर पोलीस दलाचे कौतुक करून बोलले की, ‘CEIR पोर्टलच्या योग्य वापरामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढली आहे. पालघर पोलिसांनी दाखवलेल्या या कार्यक्षमतेमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे’
तसेच नमूद कार्यक्रमात पालघर पोलीस अधीक्षक, श्री. यतिश देशमुख यांनी या मोहिमेची माहिती दिली. सदरवेळी ते म्हणाले की, ‘तांत्रिक तपास आणि मानवी गुप्तचर यंत्रणेचा योग्य वापर करून आम्ही मोबाईल शोधून काढले. अनेक दिवसांपासून मोबाईल हरवलेले असल्याने आशा सोडलेल्या नागरिकांना त्यांचा मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आम्हाला समाधान वाटले’. भविष्यातही पालघर पोलीस दल अशाच प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहील, असे आश्वासनही या वेळी देण्यात आले. सदरवेळी नागरिकांनी त्यांचा मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी पालघर पोलीसांचे आभार व्यक्त केले.
सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, अतिरिक्त कार्यभार सायबर पोलीस ठाणे, पोउपनि /रूपाली वर्तक, पोउपनि/समीर भोसले, पोन /भुषण वाघमारे, मपोना/ कविता पाटील, मपोअं/ मोनिका तिडके, पोअं/ रामदास दुर्गेष्ट पोअं/रूपेश पाटील, पोअं/ रोहित तोरस्कर, पोअं/अक्षय शेट्ये, मपोअं/ स्नेहलता ढोरे, मपोअं/ स्नेहल शेलार, मपोअं/ ऋषीका बारी सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी केलेली आहे.
