काशीगाव (मिरा-भाईंदर, वसई-विरार) : सायबर पोलिसांनी सतर्कतेने व तातडीने कारवाई करत एका महिलेची ऑनलाईन फसवणूक झालेली ₹९६,०००/- रक्कम बँकेत थांबवून तिला परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे.
तक्रारदार श्रीमती घाडगे यांना एका अनोळखी इसमाने फोन करून, त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने रक्कम पाठविल्याचा बनावट संदेश मोबाईलवर पाठवला. यानंतर अधिक रक्कम ट्रान्सफर झाल्याचे भासवून उर्वरित रक्कम परत पाठवण्यास सांगण्यात आले. विश्वास ठेवून, कोणतीही खात्री न करता तक्रारदारांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पैसे ट्रान्सफर केले. नंतर बँक खात्यात काहीच रक्कम जमा न झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रार सायबर क्राईम पोर्टल (NCCRP Portal) वर 31904250063678 या क्रमांकावर नोंदवण्यात आली. पोलिसांनी संशयिताचे बँक खाते त्वरित फ्रीझ करून रक्कम थांबवली. त्यानंतर तक्रारदारांना न्यायालयात अर्ज करण्यास सांगण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रक्कम तक्रारदाराच्या मूळ खात्यात परत करण्यात आली. तक्रारदाराच्या पतींना प्रतिकात्मक चेक देऊन माहिती देण्यात आली.
फसवणूक टाळण्यासाठी सायबर पोलिसांकडून महत्वाच्या सूचना:
- अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फोनवर आर्थिक माहिती देऊ नका.
- कोणताही संदिग्ध SMS/लिंक उघडण्यापूर्वी पडताळणी करा.
- बँकेसंबंधी माहिती मिळवण्यासाठी थेट बँकेत जावं, फोनवर माहिती देऊ नये.
- कोणतेही अॅप डाऊनलोड करताना ते अधिकृत आणि सुरक्षित आहे का, हे तपासा.
- फसवणूक झाल्यास तात्काळ 1930/1945 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करावी.
सदरची कामगिरी श्री. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सपोनि /स्वप्नील वाव्हळ, पोउपनिरी/प्रसाद शेनोळकर, पोउनि /वैभव धनवडे, मपोहवा/माधुरी धिडे, मपोअं/सुवणां माळी, मपोअं/स्नेहल पुणे, पोअं/राहुल बन, मसुब राजेश भरकडे सर्व नेम- सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.
सायबर फसवणुक हेल्पलाईन क्रमांक: १९३०/१९४५
सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईट www.cybercrime.gov.in
